ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला

0
266

गोंदिया, दि. २४ (पीसीबी) – प्रवाशांच्या झोपेच्या फायदा घेत त्यांच्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली आहे. गोंदियामध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी चोराला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

प्रवाशांच्या झोपेचा गैरफायदा घेत चालत्या रेल्वेमध्ये त्यांच्या मोबाईलवर हात साफ करणाऱ्या अट्टल मोबाईल चोरट्याला गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली. 20 वर्षीय बलजीत सिंग (राहणार कोरबा छत्तीसगढ़) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे चार महागडे मोबाईल सापडले.
गोंदिया रेल्वे स्टेशन परिसरात अनेक प्रवाशांचे सामान, महागडे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. याला आळा घालण्यासाठी गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या टीमने पेट्रोलिंगवर असतांना यशवंतपुर-कोरबा ट्रेनमध्ये आरोपी पकडले. तो संशयास्पद स्थितीत फिरत असताना पोलिसांनी त्याला हटकले. त्याने उडवाउडवीची उत्तरं दिल्यावर पोलिसांनी त्याची तपासणी केली, तेव्हा त्याच्याकडे 4 महागडे मोबाईल आढळले.
कसून चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. लगेच त्याला ताब्यात घेत मोबाईल मालकांशी संपर्क करत त्यांचे मोबाईल त्यांना परत करण्यात आले आहेत. आरोपी विरुद्ध रेल्वे कायदाच्या कलम 379 नुसार गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलिस करत आहेत.