Desh

टेहळणी करण्यासाठी पाकचे हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत घुसले

By PCB Author

September 30, 2018

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – भारतीय प्रदेशाची टेहळणी करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानच्या एका हेलिकॉप्टरने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा प्रकार जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात घडला आहे. भारतीय जवानांनी हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, त्यानतंर हे हेलिकॉप्टर पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीत परतले.

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील गुलपूर सेक्टरमध्ये आज (रविवार) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत फिरताना दिसले. याचा व्हिडिओही चित्रीत करण्यात आला आहे. या व्हिडीओत आपल्या सुरक्षा रक्षकांकडून हेलिकॉप्टरच्या दिशेने करण्यात आलेल्या गोळीबाराचा आवाजही ऐकू येतो. हा भाग दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे.

हे हेलिकॉप्टर भागाची टेहळणी करायला आले होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. नियमांनुसार, रोटरवाले कोणतेही विमान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या एक किमी जवळ येऊ शकत नाही. तर विनारोटरवाले दुसरे कोणतेही विमान सीमेच्या १० किमीच्या जवळ येऊ शकत नाही.