टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

0
691

चाकूर, दि. १३ (पीसीबी) – लातूर जिल्ह्यातील घरणी चाकूर येथे महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याला टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.

नागेश सुर्यकांत चौधरी (वय ३२, रा. देवंग्रा ता. औसा) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सातच्या सुमारास महामार्ग पोलिस ठाण्याचे पाच कर्मचारी लातूर – नांदेड रस्त्यावरील नळेगाव रोडवर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी भरधाव वेगात वडवळ नागनाथ येथून टोमॅटो घेऊन मुंबईकडे जात असलेल्या (एमएच/०३/सीटी/३४५०) क्रमांकाच्या टेम्पो चालकाने पोलिस कर्मचारी नागेश चौधरी  यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत नागेश चौधरी हे सात वर्षापासून पोलिसांत नोकरी करीत असून एक वर्षापासून महामार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत होते. लातूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले जात आहे, चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.