Sports

टेनिसपटू सानिया पुन्हा ‘टॉप्स’मध्ये

By PCB Author

April 08, 2021

नवी दिल्ली, दि.०८ (पीसीबी) : ऑलिंपिक तयारीसाठी भारतीय खेळाडूंना आर्थिक सहकार्य देणाऱ्या टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्किम (टॉप्स) योजनेत टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे.

सानियाचा यापूर्वी एकदा या योजने समावेश करण्यात आला होता. मात्र, वर्षापू्र्वी तिचे नाव योजनेतून वगळण्यात आले होते. टॉप्स समितीच्या आज झालेल्या ५६व्या बैठकीत तिचा पुन्हा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सानियाचा टॉप्समध्ये समावेश केल्याच्या वृत्ताला साईने दुजोरा दिला आहे. प्रेग्नसीच्या काळात तिने टेनिसपासू विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा कोर्टवर उतरताना तिने आपले मानांकन राखल्यामुळे तिला त्या आधारावर ऑलिंपिकसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सध्या सानिया १५७व्या स्थानावर आहे. डब्ल्यूटीएच्या नियमानुसार एखादी महिला खेळाडू दुखापत किंवा प्रेग्नसीमुळे खेळापासून दूर राहिली असेल,तर तिला विशेष मानांकनासाठी विनंती करता येते. त्यानुसार ती खेळाडू जेव्हा कोर्टपासून दूर राहिली त्या वेळचे तिचे मानांकन ग्राह्य धरता येते. सानियाने २०१७ मध्ये टेनिसमध्ये कोर्टपासून दूर आहे. त्या वेळी ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या चीन ओपन स्पर्धेनंतर ती खेळलेली नाही. तेव्हा तिची जागतिक क्रमवारी ९ होती. त्यामुळे या विशेष मानांकनामुळे ती नवव्या क्रमांकाने यापूर्वीच ऑलिंपिकसाठी पात्र ठरली आहे. अर्थात, डब्ल्यूटीए प्रत्येक वेळेस असे विशेष मानांकन मान्य करत नाही. या वेळी करोनाच्या संकटकाळामुळे त्यांनी ही योजना राबवली आहे.

आई बनल्यानंतर दोन वर्षांनी सानिया कोर्टवर उतरली. गेल्या वर्षी ती होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळली होती. त्यावेळी ती दुहेरीतच खेळली आणि युक्रेनची नादिया किचेनॉक तिची सहकारी होती.