Videsh

टी २० विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रतेचा कार्यक्रम जाहिर

By PCB Author

December 15, 2020

दुबई, दि. १५ (पीसीबी) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये होणाऱ्या टी २० विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रचा कार्यक्रम आज जाहिर केला. या स्पर्धेतील १५ संघांची निवड ही चार टप्प्यातील पात्रता स्पर्धेतून होईल आणि हा प्रवास एप्रिल २०२१ पासून विवध ११ केंद्रांवर सुरू होईल.  ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये टी २० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी १५ संघ पात्र ठरणार असून, त्यासाठी ८६ संघांना संधी मिळणार आहे. यजमान या नात्याने ऑस्ट्रेलियाला थेट प्रवेश असेल. एकूण १३ महिन्यांचा हा पात्रता प्रवास असेल. प्रथमच हंगेरी, रुमानिया, सर्बिया हे देश पात्रता स्पर्धेत उतरणार आहेत. पात्रता स्पर्धेते विशेष म्हणजे या पहिल्या पत्राता स्पर्धेचे आयोजन जपानमध्ये करण्यात येणार आहे, असे आयसीसीने आपल्या प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे.

विभागीय स्तरावर एखूण ६७ सहयोगी सदस्य देशांचे संघ सहभागी होणार आहेत. यातही आफ्रिका आणि युरोपमधील वाढता सहभाग लक्षात घेता या दोन्ही विभागात उप-विभागीय स्पर्धा घेण्यात येईल. एकूण १६ पात्र संघांमध्ये एक संघ आफ्रिका आणि ईएपीमधील असेल. अमेरिका आणि युरोपमधून प्रत्येकी दोन संघ पात्र ठरतील. आशियातील ए आणि बी पात्रता स्पर्धेतून प्रत्येकी एकेक असे आठ संघ येतील. उर्वरित आठ संघांपैकी चार संघ हे २०२१च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या गुणतक्त्यातील अखेरचे चार संघ असतील. नेपाळ, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती आणि झिंबाब्वे हे चार संघ आयसीसी टी २० क्रमवारीनुसार थेट मुख्य पात्रता स्पर्धेत खेळतील. पात्रता फेरीतून चार संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील. ऑस्ट्रेलिया थेट पात्र असेल, तर अन्य अकरा संघ हे आयसीसीच्या क्रमवारीनुसार ठरतील.

भारतात पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, नामिबिया, नेदरलॅंडस, न्यूझीलंड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यु गिनी, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका,श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे संघ खेळणार आहेत.