टी-२० महिला विश्वचषकः भारताचे आव्हान संपुष्टात; स्पर्धेतून बाहेर

0
585

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – अॅमी जोन्स आणि नताली स्किवर यांनी केलेल्या ९२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टी-२० महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडनं भारतावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे भारताचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव आहे.

भारताने दिलेले ११२ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर टॉमी बेमाँड अवघी १ धाव काढून बाद झाली. त्यानंतर काही अंतराने डेनियल वेट माघारी परतली. त्यानंतर यष्टीरक्षक अॅमी जोन्स आणि नताली स्किवर या दोघींनी आपापली अर्धशतके झळकवत इंग्लंडचा डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून दीपाली शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय भारतीय सलामीवीर जोडीने योग्य ठरवला. स्मृती मंधाना आणि तानिया भाटिया जोडीने पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना बाद झाल्यानंतर तानिया भाटियाही बाद झाली.

कर्णधार हरमनप्रीत कौरने जेमिमा रॉड्रिग्जच्या साथीने भारताचा डाव सावरला. मात्र, रॉड्रिग्ज माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या सर्व फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिले. दुसऱ्या बाजूने कर्णधार हरमनप्रीत कौरने फटकेबाजी करत भारताच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. भारताकडून स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, तानिया भाटिया आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या फलंदाजांचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली. इंग्लंडकडून कर्णधार हेदर नाइटने ३ तर सोफी एस्कलटोन आणि ख्रिस्ती गॉर्डन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.