Desh

टीम इंडियामध्ये रवी शास्त्रींच्या कारभारामुळे असंतोष; कोहली आणि रोहितचे दोन गट?

By PCB Author

July 13, 2019

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एकतर्फी कारभारामुळे संघात असंतोष पसरल्याचे वृत्त समोर आले आहे. शास्त्री आणि कोहली हे कोणालाही विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे कोहली आणि रोहित शर्मा असे दोन गट पडल्याचे म्हटले जाते.

शास्त्री आणि विराट यांच्या मनमानी कारभाराला विरोध न होण्याचे कारण म्हणजे ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा भारतीय कर्णधाराला असलेला पाठिंबा. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांचा अपवाद वगळता विराट कोहलीच्या गटातल्या खेळाडूंनाच भारतीय संघात स्थान दिले जात असल्याचा आरोप होत आहे. अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरला देण्यात आलेली संधी हे त्यांच्या एककल्ली निर्णयाचे उदाहरण मानले जाते. एका वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

लोकेश राहुलचा फॉर्म चांगला नसला, तरी सलामीचा किंवा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून त्याला संधी देण्यात येते. राहुल किमान १५ जणांच्या संघात राहील, ही दक्षता घेतली जाते. युजवेंद्र चहलचे घोडे कायम कुलदीप यादवच्या पुढे दामटण्याचा प्रयत्न होताना दिसतो, असाही आरोप केला जात आहे. अर्थात, भारतीय संघात दोन विराटचा आणि रोहित शर्माचे दोन गट पडले असले, तरी संघात फूट पडावी इतपत मतभेद टोकाला गेलेले नाहीत.

अंबाती रायुडू सलग अपयशी ठरावा यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करण्यात आली. त्यानंतर मोठ्या चलाखीने त्याचा विश्वचषकाच्या संघातून पत्ता कापण्यात आला, असा दावा करण्यात आला आहे. शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्या कारनाम्यांकडे विराट कोहलीचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचेही म्हटले जात आहे. विराट कोहली संघासाठी मैदानात कामगिरी बजावतोय, पण शास्त्री आणि अरुण ही जोडगोळी कधी जाते, असे टीम इंडियाच्या शिलेदारांना झाले आहे.