टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा निवड  

0
392

मुंबई, दि. १६ (पीसीबी) –  टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी २०२१ पर्यंत रवी शास्त्री कायम राहतील, अशी घोषणा बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे प्रमुख कपिलदेव यांनी  आज (शुक्रवार) केली.   शास्त्री यांची ही चौथी टर्म दोन वर्षांची असून  २०२१ मधील  विश्वचषकापर्यंत प्रशिक्षकपदावर राहतील.

शास्त्री यांच्यासह टॉम मूडी, माईक हेसन, फिल सिमन्स, रॉबिन सिंह आणि लालचंद राजपूत हे पाचजण भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. यातील सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्याची जबाबदारी माजी कर्णधार कपिलदेव, माजी कसोटीवीर अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय समितीवर सोपवण्यात आली होती.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीत रवी शास्त्री यांच्या आजवरच्या कामगिरी इतकाच कर्णधार विराट कोहलीचा त्यांना असलेला पाठिंबा निर्णायक ठरला. मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीत तुझा पाठिंबा पुन्हा रवी शास्त्री यांनाच राहणार का, असा प्रश्न विंडीज दौऱ्यावर रवाना होण्याआधी कर्णधार विराट कोहलीला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने शास्त्रींच्या नावाला पसंती दिली होती.