Maharashtra

टीआरपी साठी पैसे देणारे आणखी दोघे जेरबंद

By PCB Author

October 21, 2020

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – पैसे देऊन TRP वाढवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामजी वर्मा आणि दिनेश विश्वकर्मा अशी या दोन आरोपींची नावं आहेत. TRP घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  मुंबई क्राइम ब्रांचकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हंसा या रिसर्च एजन्सीचे माजी कर्मचारी आहेत.

रामजी आणि दिनेश दोघेही काही वर्षांपूर्वी ‘हंसा’साठी काम करत होते. रामजीला वरळी भागातून तर दिनेशला मुंबई एअरपोर्टवरून अटक ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. TRP घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विशाल भंडारी आणि उमेश मिश्रा यांच्या चौकशीत दिनेशचं नाव समोर आलं होतं. TRP वाढवण्यासाठी दिनेश विशालला पैसे देत असल्याचं चौकशीत पुढे आलं होतं. त्यामुळे मुंबई पोलीस दिनेशच्या मागावर होते. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना बुधवारी कोर्टात हजर केलं जाईल.

मुंबई पोलिसांनी TRP घोटाळ्यात अर्णव गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीविरोधात पुरावे हाती लागल्याचा दावा केला होता. आरोपी आणि साक्षीदारांनी चौकशीत रिपब्लिक टीव्हीचं नाव घेतल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली होती.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी बुधवारी रिपब्लिक टीव्हीचे एक्झिक्युटिव्ह एडीटर, चिफ फायनान्सस ऑफिसर आणि डिस्ट्रीब्युशन प्रमुखांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पैसे देऊन TRP वाढवण्याप्रकरणी मुंबई पोलीस रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनल्सची चौकशी करत आहेत. मंगळवारी, उत्तरप्रदेश पोलिसांनी या प्रकरणी एक FIR दाखल केली आहे. याची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतला आहे.