टिम पध्दतीमुळे खुन आणि मोक्कातील फरार आरोपी जेरबंद

0
1159

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – खुन आणि मोक्काच्या गुन्ह्यातील फरार दोन सराईत आरोपींना अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. मार्शल पध्दत बंद करुन पोलिसांनी टिम पध्दत अवलंबल्याने हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.  

मंगेश नामदेव पालवे (वय २८, रा. मोरेवाडी, ता. मुळशी) आणि करन रतन रोकडे (वय २१, रा. रोकडे वस्ती, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्यातील टीम क्रमांक ३ आणि १७ हे भूमकर चौकात शनिवारी (दि. ६) गस्त घालत होते. यावेळी आरोपी मंगेश हा पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता तो पौड पोलीस ठाण्यातील एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे उघड झाले.

तर दुसऱ्या कारवाईत आज (रविवारी) दुपारी दीडच्या सुमारास कस्पटे चौक येथे टीम क्रमांक १० आणि १७ कार्यरत होते. त्यावेळी देहूरोड पोलीस ठाण्यातील मोक्का कारवाई झालेला आणि फरार असलेला आरोपी करन रोकडे एका चहाच्या टपरीवर थांबल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता तो देहूरोड पोलीस ठाण्यातील मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे समोर आले.

दरम्यान टिम पध्दत अवलंबल्याने पोलिसांना काही प्रमाणात गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी आणि आरोपींना पकडण्यात यश मिळताना दिसत आहे.