Chinchwad

टीडीआरच्या फाईलवर सही न केल्याने पिंपरी महापालिकेच्या अभियंत्याला नगरसेवक राहुल कलाटे कडून शिवीगाळ करुन धमकी; गुन्हा दाखल

By PCB Author

February 13, 2019

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – टीडीआरच्या फाईलवर सही न केल्याच्या रागातून महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक राहुल कलाटे आणि त्यांचा साथीदार विनोद मोरे या दोघांनी फोन करुन तसेच महापालिका भवनातील कार्यालयात जाऊन महापालिकेचे अभियंते अनिल महादेव राऊत यांना शिवीगाळ करुन धमकावले.

याप्रकरणी अनिल राऊत यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नगरसेवक राहुल कलाटे (वय ३५, रा. वाकड) आणि त्यांचा साथीदार विनोद मोरे (वय २८, रा. पिंपरी) या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.११ फेब्रुवारी) रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यरत असलेले अभियंते अनिल राऊत यांनी टीडीआरच्या फाईलवर सही न केल्याने नगरसेवक राहुल कलाटे आणि त्यांचा साथीदार विनोद मोरे यांनी प्रथम राऊत यांना फोनवर शिवीगाळ करत पाहुन घेण्याची धमकी दिली. तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीतील कार्यालयात जाऊन राऊत यांची गचंडी धरुन शिवीगाळ केली. याप्रकरणी राहुल कलाटे आणि विनोद मोरे या दोघांवर सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्याला धमकावणे या गुन्ह्यांअंतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.