टाळ मृदुंगाच्या निनादात दोन्ही पालख्यांचे पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान

0
603

पुणे, दि. ९ (पीसीबी) – माऊली… माऊली… चा जयघोष करत, टाळ-मृदुंग आणि पखवाजाच्या तालावर नाचत, पुणेकरांच्या सेवेचा लाभ घेत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूर कडे मार्गस्थ झाल्या. दोन्ही पालख्या दिवेघाटात पोहचल्या आहेत.

दरवर्षी दोन्ही पालख्यांवर वरुण राजाची होणारी बरसात यावेळी मात्र झाली नाही. सकाळी साडेनऊच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हडपसर येथे आगमन होताच भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडाली. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांना विविध फळे आणि खाऊ वाटप करून त्यांना प्रवासासाठी पुढे मार्गस्थ करण्यात आले. आज सासवड येथे या पालखीचा मुक्काम आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे हडपसर येथे साडेबाराच्या सुमारास आगमन झाले. तुकाराम महाराज यांची पालखी लोणी काळभोर येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.

या दोन्ही पालख्या काल पुण्यात मुक्कामी होत्या. संत तुकाराम महाराजांची पालखी भवानी पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पालखी विठोबा मंदिरात विसावली होती.  पुणेकरांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल (रविवारी) पुण्यात पालख्यांचे दर्शन घेतले.