टाळेबंदीच्या काळाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून एनटीपीसीने 19,000  कर्मचारी बांधवांसाठी डिजिटल प्रशिक्षण

0
342

नवी दिल्ली – दि. 1(पीसीबी): राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ म्हणजेच एनटीपीसी या सर्वात मोठ्या ऊर्जा उत्पादन क्षेत्रातल्या केंद्रीय सार्वजनिक संस्थेचे कामकाज ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत केले जाते. या संस्थेने कोविड-19 महामारीमुळे जारी झालेल्या टाळेबंदीच्या काळाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला. एनटीपीसीने आपल्या 19,000 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी बांधवांसाठी आणि त्यांच्या परिवारातल्या सदस्यांसाठी नवीन डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकण्याची आणि आपल्यामध्ये विकास घडवून आणण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. यामुळे डिजिटायझेशनचा लाभ घेण्यासाठी एनटीपीसीचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय आता  सक्षम झाले आहेत.
याशिवाय कंपनीने आपल्या कर्मचारी वर्गाला तांत्रिक अभ्यासक्रम आभासी वर्गाच्या माध्यमातून ऑनलाईन शिकवला. यासाठी एनटीपीसीने जागतिक बँकेची मदत घेतली. या प्रशिक्षणामध्ये कर्मचा-याचे मूल्यांकन करण्यात आले आणि यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणा-यांना प्रमाणपत्रेही देण्यात आली.
ऊर्जा व्यवस्थापन संस्थेच्या शिक्षण आणि विकास केंद्राच्यावतीने कर्मचारी बांधवांसाठी तांत्रिक, कार्याशी संबंधित, आरोग्य आणि सुरक्षा;  अशा विविध विषयांवर 250 पेक्षा जास्त प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय एनटीपीसीच्या प्रादेशिक शिक्षण आणि विकास केंद्रांमध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त ऑनलाईन शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत.
सध्याचा संकटाचा काळ लक्षात घेवून आपल्या कर्मचा-यांसाठी निरंतर शैक्षणिक सत्रांचे आयोजन करून त्यांच्यातली कौशल्ये अधिक विकसित आणि अद्ययावत करण्यासाठी हा वेळ वापरण्याचा निर्णय या महारत्न संस्थेने घेतला आहे. म्हणूनच इतर संस्थांच्या सहयोगाने ‘45 दिवसांचे शैक्षणिक आव्हान’ या अंतर्गत कर्मचा-यांना तांत्रिक, आर्थिक आणि मनुष्यबळ विकास या सारख्या विविध विषयांचे 45 दिवस अभ्यासपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे शैक्षणिक सत्र पूर्ण करणा-या यशस्वी कर्मचा-यांना घरामध्ये राहून प्रमाणपत्रे मिळवण्याची संधी यामुळे मिळाली आहे.
आपल्या कर्मचारी वर्गाची आणि त्यांच्या परिवाराची एकूणच सर्वांगाने प्रगती व्हावी, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची मानसिक, शारीरिक सज्जता निर्माण व्हावी, आणि सर्वांनी जीवन जगण्याची कला शिकून घ्यावी, यासाठी एनटीपीसीने टाळेबंदीच्या काळामध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या संयुक्त विद्यमाने एक कल्याणकारी कार्यक्रम आयोजित केला. सध्याच्या त्रासदायक काळामध्ये ईएपी म्हणजेच कर्मचारी सहायक कार्यक्रमाच्या माध्यमातून समुपदेशनासाठी ‘स्नेहल 2.0’ चे आयोजन करण्यात आले होते. ईएपी सेवेची व्याप्ती वाढवण्यासाठी आली असून आता ही सेवा 24 तास सुरू असणार आहे. ही सेवा आता एनटीपीसीच्या कर्मचा-यांच्या परिवारातले सदस्यही वापरू शकतात आणि ईएपी सेवा पूर्णतः गोपनीय आणि वापरकर्त्यालाच तिचा उपयोग होवू शकेल, अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

याचबरोबर एनटीपीसीच्यावतीने टर्बाईन, बॉयलर, वॉटर,  केमिस्ट्री, नवीकरणीय ऊर्जा आणि इतर महत्वपूर्ण ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स विभागातल्या कर्मचा-यांसाठी संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या  प्रशिक्षकांचे  तसेच अतिथी व्याख्यात्यांच्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाईन व्यासपीठ, वेबिनार्स, तसेच अंतर्गत कार्यासाठी विकसित केलेल्या ‘संवाद’ या मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तसेच पोर्टलव्दारे  कर्मचा-यांना प्रशिक्षणाचा लाभ देण्यात आला.