Bhosari

टाळेबंदीचे निर्बंध अधिक कडकपणे राबवा ः अजित पवार

By PCB Author

April 25, 2020

पिंपरी, दि. २५ (पीसीब) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीचे निर्बंध अधिक कडकपणे राबवा, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम,  जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार या बैठकीत म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यू दर कमी करणे आवश्यक आहे. या भागात गर्दी होऊ नये, यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येऊ नये. कंटेंटमेंट भागात लॉकडाउनचे धोरण पोलीस प्रशासनाने कडक अवलंबून कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाइन करुन त्यांना अन्नधान्य आणि अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे, आदेश त्यांनी दिले.