टाटा मोटर्स’कार विभागाचा रखडलेला वेतनवाढ करार मार्गी; पण कामगारांमध्ये तीव्र नाराजी

0
168

पिंपरी, दि. १ (पीसीबी) -टाटा मोटर्स कंपनीतील कार विभागाचा (कार प्लान्ट) जवळपास ८ महिने रखडलेला वेतनवाढ करार अखेर मंगळवारी (२९ नोव्हेंबर) मार्गी लागला. अपेक्षाभंग झाल्याने कामगारांमध्ये नाराजी पसरल्याचे दिसून आले.टाटा मोटर्सच्या पुणे प्रकल्पातील वेतनवाढ करार यंदापासून दर तीन वर्षांऐवजी दर चार वर्षानंतर होणार आहे. १ सप्टेंबर २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या चार वर्षांसाठी हा वेतनवाढ करार करण्यात आला आहे. त्यानुसार, कामगारांना चार टप्प्यात १८ हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे.

कामगारांचा विरोध असतानाही संघटना पदाधिकाऱ्यांनी करार कालावधीतील बदल मान्य केला. तेव्हापासूनच कामगारांमध्ये नाराजीचा सूर होता. कंपनीतील इतर विभागांचा वेतनवाढ करार झाला. त्याच पद्धतीने कार विभागाचा करार तेव्हा झाला नाही. त्यावरून या नाराजीत भर पडली होती. या पार्श्वभूमीवर, कामगार संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यात सोमवारी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर, मंगळवारी सह्यांची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. परंपरेला छेद देऊन अगोदर सह्या झाल्यानंतर याबाबतची माहिती कामगारांना देण्यात आली.

करारातील मसुद्यानुसार, कार विभागातील वेतनवाढ कराराचा कालावधी साडेतीन वर्षांचा राहील. मात्र, यापुढील वेतनवाढ कराराचा कालावधी नियमितपणे चार वर्षांचा राहील. कंपनीने चहा, नाष्टा. जेवणाची वेळ पूर्णपणे बदलली असून चहाच्या सुटीतील पाच मिनिटे कमी केली आहेत. आधी १० मिनिटे असलेली चहाची वेळ आता ५ मिनिटेच केली आहे.

कंपनीच्या दसरा-खंडेनवमीच्या पूजेवर बहिष्कार टाकून कामगारांनी आपली नाराजी यापूर्वीच दाखवून दिली होती. कार विभागाचा वेतनवाढ करार झाल्याशिवाय बोनसच्या विषयावर चर्चा नको, अशी अट कामगार संघटनेने व्यवस्थापनासमोर ठेवली होती. तथापि, व्यवस्थापनाने प्रतिसाद दिला नाही. वेतनवाढ करार व बोनसचा विषय परस्परांशी जोडू नका, असे बहुसंख्य कामगार नेत्यांचे म्हणणे होते. यावरून बरेच दिवस तिढा होता. तोडगा काढण्याचे प्रयत्न फोल ठरले. त्यामुळे कंपनीने २१ ऑक्टोबरला एकाच दिवशी सरसकट सर्व कामगारांच्या खात्यात ३० हजार ५०० रूपये रक्कम थेट जमा केली होती. दिवाळी होऊन महिना उलटला तरी अजूनही बोनसचा अंतिम निर्णय झालेला नाही.