Maharashtra

टाटा एअरबस’ प्रकल्पावरुन जयंत पाटलांचा राज्य सरकारला संतप्त सवाल, म्हणाले…

By PCB Author

October 28, 2022

मुंबई ,दि.२८(पीसीबी) – टाटा एअरबस’ हा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला मिळाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे. “गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्यांच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे सरकारला केला आहे.

‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा ‘टाटा एअरबस’ प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर जयंत पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते,” असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का? असा थेट प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमधील बडोदा येथे उभारण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण सचिव अजयकुमार यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असून त्यापूर्वी हा समारंभ होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने ‘एअरबस’ कंपनीशी २१ हजार कोटींचा करार केला होता. त्याअंतर्गत जुन्या ‘अ‍ॅवरो-७४८’ विमानांची जागा ‘सी-२९५’ ही अत्याधुनिक विमाने घेणार आहेत. या विमानाच्या ९६ टक्के भागांची निर्मिती भारतात होणार आहे.