Maharashtra

झोमॅटो शेअर घेणाऱ्यांची चांदी

By PCB Author

July 23, 2021

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – झोमॅटोच्या बहुचर्चित शेअरनं शुक्रवारी अत्यंत झोकात बाजारात पदार्पण केलं. ज्यावेळी शेअर बाजारात झोमॅटोच्या शेअरची नोंदणी झाली, त्यावेळी एका शेअरचा भाव ११५ रुपये इतका झाला. मूळ आयपीओच्या वेळी हा भाव ७६ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता, त्यात तब्बल ५१ टक्क्यांची वाढ शेअर बाजारात शुक्रवारी पदार्पण होताच झाली. तर, काही वेळातच गुंतवणूकदारांनी या शेअरच्या खरेदीसाठी झुंबड केली आणि शेअरचा भाव मूळ किमतीच्या तब्बल ८२ टक्क्यांनी वधारत प्रति शेअर १३९ रुपयांपर्यंत पोचला. बाजारातील भांडवली मूल्याचा विचार केला तर झोमॅटोनं एक लाख कोटी रुपयांचा पल्ला पदार्पणाच्या दिवशीच पहिल्या काही तासांतच गाठला आहे. आयपीओ किंवा प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरची खरेदी केली त्यांची गुंतवणूक पहिल्याच दिवशी जवळपास दुप्पट झाली आहे.

केवळ शेअर्सच्या संख्यात्मक उलाढालीचा विचार केला तर शुक्रवारी सकाळी काही तासांमध्ये मुंबई शेअर बाजारात ४२ लाख शेअर्सची व राष्ट्रीय शेअर बाजारात १९.४१ कोटी शेअर्सची खरेदी विक्री सुरूवातीच्या काही तासांतच झाली आहे. झोमॅटोचा ९,३७५ कोटी रुपयांचा आयपीओ १४ ते १६ जुलैदरम्यान विक्रीसाठी आला होता. फूडटेक या प्रकारात मोडणाऱ्या या कंपनीच्या समभागासाठी उपलब्ध केलेल्या शेअर्सच्या तुलनेत ३८ पट जास्त मागणी नोंदवण्यात आली तेव्हाच हा आयपीओ म्हणजे मेगा सक्सेस असेल हे दिसून आले होते. मार्च २०२० मध्ये आलेल्या एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसच्या १०,३४१ कोटी रुपयांच्या आयपीओनंतरचा हा सर्वात मोठा आयपीओ आहे.