Banner News

‘झेंडे समुहाकडून २२.४६ कोटींचा बँकेला गंडा’: सेवा विकास बँक घोटाळा – ‘भाग ८’

By PCB Author

September 08, 2021

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – दि सेवा विकास को-ऑप. बँकेच्या घोटाळ्याबाबतच्या लेखापरीक्षण अहवालातून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे पुढे आली आहे. एखाद्या नादान बँक अध्यक्षापायी आणि त्याला डोळेझाकून पाठिंबा देणाऱ्या राजकारण्यांमुळे हजारो ठेवीदार, खातेदारांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. पिंपरी चिंचवड शहरातील कष्टकरी, व्यापारी, छोटे कारखानदार यांचा पैसा तथाकथित मोठे उद्योज, राजकारणी, बिल्डर्स, वकिली यांनी अक्षरशः लुटला आहे. गेल्या पाच-सहा वर्षांतीलच हा घोटाळा असल्याने आता त्याबाबत आताचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडी सरकार अत्यंत गंभीर असल्याने बँकेची लूट कऱणाऱ्यांना सजा होईल असे दिसते. १२४ कर्ज प्रकरणांत ३९ समुहांनी मिळून ४२९.५७ कोटी रुपयेचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणातून आजवर सिध्द झाले. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशामुळे १२ ऑगस्ट २०२१ रोजी सागर सुर्यवंशी आणि विशाल सुर्यवंशी यांच्या १० प्रकरणांत (६०.६७ कोटी रुपये), विनय,विवेक, दीप्ती आऱ्हाना, रोझरी ग्लोबल एज्युकेशन यांच्या १६ प्रकरणांत (४३.१८ कोटी रुपये) तसेच धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर यांच्या ५ प्रकऱणांत (१०.३७ कोटी रुपये) फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य कर्जदार, संचालक व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायचे काम सुरू आहे.

बँक घोट्ळायाचा लेखापरीक्षण अहवाल तब्बल २००० पानांचा असून आजच्या आठव्या भागात झेंडे समुहाने बँकेला २२.४६ कोटींना कसे तगवले ते आपण पाहणार आहोत. सेवा विकास बँकेच्या देहूरोड शाखेतून विविध ५ कर्ज प्रकऱणांत झेंडे समुहाच्या साई डेव्हलपर्स, सोनल डेव्हलपर्सचे संचालक सुमिता मनिष झेंडे, मनिष रघुनाथ झेंडे यांना कर्ज देण्यात आले होते. सोनल डेव्हलपर्स ला पहिले ५ कोटी कर्ज २ जानेवारी २०१३ रोजी ८४ महिन्यांच्या मुदतीसाठी २० टक्के दराने कर्ज मंजूर केले. अशाच पद्धतीने नंतर २.५ कोटी रुपये १९ मार्च २०१५ रोजी,५ कोटी रुपये १० ऑक्टोबर २०१६ रोजी, ५.२० कोटी रुपये २१ सप्टेंबर २०१७ रोजी आणि १.७२ कोटी रुपये ३ ऑक्टोंबर २०१७ रोजी कर्ज देण्यात आले होते.

या सर्व ५ कर्ज प्रकऱणांसाठी बाणेर येथील साई वाटीका मधील तयार होणारे ७ फ्लॅटस, बालेवाडी येथील ८ फ्लॅट्स, प्राधिकरणातील एबीसी स्केअर मधील प्लॉट नं.२, टाकवे फाळणे येथील ६५ गुंठे जागा, तळेगाव येथील ८७ गुंठे जागा, देहूरोड झेंडेमळा ५००० चौ.फूट तागेतील दोन दुकाने व निवासी इमारत, पाषणा येथील ७३.२२ चौ.मी.चे बांधकाम असे तारण देण्यात आले होते. या सर्व ५ कर्जांसाठी तारण दिलेल्या मालमत्तांचा विचार करता त्याचे मूल्य २१.८३ कोटी रुपये दाखविण्यात आले, ते अतिरिक्त दिसते. प्रत्यक्षात तारण मालमत्तांमध्ये कर्जदारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींचाही समावेश आहे. सर्व तारण मालमत्तांचा सर्च रिपोर्ट घेतलेला नाही. तारण मालमत्ता या निर्वेध व विक्री योग्य नाहीत. तारण मालमत्तांचे मूल्य हे येणे कर्ज रकमेच्या तुलनेत अत्यल्प आहे. या समुहाकडे कर्जाची व्याजासह येणे असलेली रक्कम २२.४६ कोटी रुपये आहे.

वितरीत कर्ज निधीचा दुरुपयोग झाल्याचा अभिप्राय लेखापरीक्षकांनी दिला आहे. पहिले कर्ज घेतले त्यातून बाणेर नागरी पतसंस्थेचे कर्जात सचिन आपटे यांना पे ऑर्डरने रक्कम वर्ग केली. दुसऱ्या कर्जातून बाणेर नागरी पतसंस्थेचे कर्जात व सुदाम नारंग व्हेंचर्स यांच्या कर्ज खात्यासाठी विनियोग केला. बहुताशी कर्ज ही पूर्वीची कर्ज थकबाकी नियमीत करण्यासाठी वापरलेली आहेत. हा कर्ज रकमेचा गैरवापर असल्याने बँकेचे संचालक मंडळ या कटकारस्थानात सहभागी असल्याचे सिध्द होते. कर्जनिधीची व्याप्ती पाहता २२.४६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार व अपहार होऊन ठेवीदार व सभासदांची फसवणूक झाल्याचा शेरा लेखापरीक्षकांनी दिला आहे.