झटपट पैसे कमवण्याच्या नादात इंजिनीअरिंगचे विद्यार्थी बनले तस्कर

0
2424

सटाणा, दि. १९ (पीसीबी) – झटपट पैसे कमवण्याच्या नादात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी चक्क साप तस्कर बनल्याचे समोर आले आहे. सटाणा पोलिसांनी याप्रकरणी दोघा विद्यार्थ्यांसह त्यांच्या एका नातेवाईकाला मांडूळ जातीच्या सापासह अटक केली आहे.

यश संजय निकम (रा. आराई ता. सटाणा),  मयूर नागेश सोनवणे (रा. साक्री) आणि यश निकम याचा मामा स्वप्नील दादासाहेब पगार (रा. आघार खुर्द ता. मालेगाव) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा शहरातील राधाई लॉन्सवर मांडूळ सापाची अवैध विक्री करण्याच्या तयारीत काही तस्कर असल्याची गोपनीय माहिती सटाणा पोलिसांना मिळाली होती. यावर सटाणा पोलिसांनी राधाई लॉन्सवर छापा टाकत यश निकम आणि मयूर सोनवणे यांची विचारपूस करून त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यांच्याजवळ मांडूळ जातीचा साप आढळून आला. पोलिसांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत मांडूळासह आरोपींना वन विभागाकडे सुपूर्द केले. सटाणा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज (शुक्रवारी) आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडे सखोल चौकशी केली असता आरोपी यश निकम याचा मामा स्वप्नील पगार यांच्याकडून मांडूळ मिळाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलिसांनी स्वप्नील पगार यालाही ताब्यात घेत वनविभागाच्या हवाली केले आहे. तर जागतिक बाजारपेठेत लाखो रुपयांची किंमत मिळत असल्याचे यू ट्यूबवर पाहिल्यामुळे हे कृत्य केल्याचे आरोपींनी सांगितले आहे.

संजय आणि मयूर हे दोघेही रायगड येथील इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आहेत. चक्क इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.