ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन

0
542

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – पद्मश्रीपुरस्कार विजेते गोव्याचे ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे आज (शनिवारी) निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. मुंबई येथील नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सोलो हार्मोनियम वादनातील एक आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसापासून पंडित तुळशीदास बोरकर हे हार्नियाच्या त्रासाने त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना परत घरीदेखील आणण्यात आले होते. मात्र पंधरा दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना  नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना टीबी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

गोव्यातील बोरी या गावामध्ये १८ नोव्हेंबर १९३४ साली तुळशीदास बोरकर यांचा जन्म झाला होता. मात्र ते गोवा सोडून पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांनी मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम वादनाचे धडे गिरविली. त्यासाठी त्यांना रोज मुंबई- पुणे असा प्रवास करावा लागत असे. विशेष म्हणजे या त्यांना या कारकिर्दीत उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी कलावंतांना साथ केली. शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल २०१६ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.