ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव काळाच्या पडद्याआड

0
639

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव (वय ९१) यांचे आज (मंगळवार) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांनी चिकनगुणिया झाला होता. तसेच न्यूमोनियाही झाल्याचे निदान झाले होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. अखेर त्यांची पहाटे प्राणज्योत मालवली.

यशवंत देव यांचा १ नोव्हेंबर १९२६ मध्ये जन्म झाला होता. त्यांना घरातच वडिलांकडून संगीताचे बाळकडू मिळाले. त्यांच्याकडून त्यांनी तालाचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर मुंबई आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. त्यांचा भावसरगम हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्यानंतर त्यांनी संगीतकार, गायक, कवी म्हणून नाव कमावले.

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, असेन मी नसेन मी, अखेरचे येतील माझ्या, दिवस तुझे हे फुलायचे, स्वर आले दुरूनी, तिन्ही लोक आनंदाने, जीवनात ही घडी, अशी अनेक गाणी त्यांनी अजरामर केली. चित्रपट संगीतासह त्यांनी अनेक नाटकांसाठी संगीत दिले.