ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं प्रदीर्घ आजारामुळे निधन

0
516

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं प्रदीर्घ आजारामुळे निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अत्यंत सहज सोप्या हिंदी भाषेतील राजकिय विश्लेषण, मार्मिक टिपण्णी घेणारे विनोद दुआ यांचे दर्शन आता कधीही होणार नाही. गुरुग्राम इथल्या मेदांता हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विनोद यांच्या पश्चात दोन मुली आहेत. त्य़ापैकी बकुळ दुआ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत तर मल्लिका दुआ कॉमेडिअन आहेत.

हिंदी टीव्ही पत्रकारितेचे मानकरी म्हणून दुआ यांचं मोलाचं योगदान होतं. दूरदर्शन, एनडीटीव्ही तसंच वायर संस्थांसाठी दुआ यांनी काम केलं. “निर्भय आणि अतुलनीय आमच्या वडिलांचं निधन झालं आहे. ते विलक्षण आयुष्य जगले. दिल्लीतल्या रेफ्युजी कॉलनीतून बाहेर पडत त्यांनी पत्रकारितेच्या शिखरापर्यंत वाटचाल केली. त्यांची पत्रकारिता कारकीर्द 42 वर्षांची होती. त्यांनी आपल्या कामातून सातत्याने सत्य मांडलं”, असं मल्लिका दुआ अर्थात विनोद दुआ यांच्या कन्या यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी विनोद आणि त्यांच्या पत्नी पद्मावती दुआ यांना कोरोनाची लागण झाली होती. पद्मावती या चिन्ना दुआ नावाने प्रसिद्ध आहेत. दुर्देवाने पद्मावती यांची कोरोनाविरुद्धची लढाई 11 जून रोजी थांबली. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर विनोद यांची प्रकृती ढासळतच गेली. रविवारी लोधी स्मशानभूमीत विनोद यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत अशी माहिती मल्लिका यांनी दिली आहे.