ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे भाजपामध्येच : शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे – हकालपट्टी केल्याची चर्चा तथ्यहीन

0
1000
  1. पिंपरी, दि. 20 (पीसीबी) –
    भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे या अभ्यासू, स्पष्टवक्तेपणा असलेल्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत.
    गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून सावळे या शहराच्या राजकारणाशी निगडीत आहेत. त्यांची भाजपामधून कोणतीही हाकालपट्टी करण्यात आलेली नाही. अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ऑक्टोबर महिन्याची महासभा बुधवारी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना ज्येष्ठ सदस्य सीमा सावळे यांनी त्यांच्या बाबत केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह लिखाणाबद्दल सभागृहाला लक्षात आणून दिले. यानंतर सभेचे कामकाज सुरू होते. सदस्य विविध विषयावर यावेळी सभागृहात बोलत होते. यानंतर त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा एका खाजगी वेबपोर्टलच्या पत्रकाराने काही लिखाण केले. त्यामध्ये भाजपने “हकालपट्टी केलेल्या नगरसेविका” असा उल्लेख केला. यावर संतापलेल्या सावळे यांनी सभागृहाच्या हे निदर्शनास आणून देत संबंधित पत्रकारावर कारवाई करण्याची मागणी केली.
    या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ज्येष्ठ सदस्य सीमा सावळे यांची पक्षाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. सीमा सावळे या शहरातील ज्येष्ठ नगरसेविका असून प्रखरपणे वास्तववादी विषयावर मत व्यक्त करणे हा त्यांचा पिंड आहे .मात्र नाहक त्यांची हकालपट्टी केल्याची चर्चा घडवून आणली जात आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. येत्या चार महिन्यांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची केली जाणारी चर्चा ही चर्चा तथ्यहीन आहे. तोंडावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुका भाजप या सर्व जुन्या जाणत्या नगरसेवकांना सोबत घेऊन लढणार आहे. त्यामुळे सावळे यांच्याबाबत केल्या जाणाऱ्या चर्चेला कोणताही अर्थ नसल्याचे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.