Maharashtra

ज्येष्ठ कलाकारांसाठी वृद्धाश्रम बांधण्याला विक्रम गोखले यांनी दिली अडीच कोटीची जागा

By PCB Author

May 28, 2020

पिंपरी, दि. 28 (पीसीबी) : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुन्हा एकदा आपला दानशूरपणा दाखवून समाजासमोर आदर्श उभा केला आहे. चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांसाठी वृद्धाश्रम बांधण्यासाठी विक्रम गोखले यांनी त्यांची नाणेगाव येथील सुमारे एक एकर जमीन महामंडळाकडे देणार असल्याची घोषणा बुधवारी (दि.27) केली आहे.

टाळेबंदी उठल्यानंतर ही जागा महामंडळाला देण्याबाबत करार होणार असल्याची माहिती अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे. या जागेची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे आपल्या कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर त्यांच्या औदार्यासाठी पण ओळखले जातात. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला होता. त्यांचा दानशूरपणा आता कलाकारांच्या वृद्धाश्रम बांधण्याच्या संकल्पनेतूनही दिसत आहे.

कलाकारांचे वृद्धापकाळात होणारे हाल थांबतील नाणेगाव येथे एक एकर जागा विक्रम गोखले यांनी महामंडळाला देणगी म्हणून देण्याची घोषणा आज केली आहे. या जागेवर महामंडळाच्या निधीतून वृद्धाश्रम बांधले जाईल. यामुळे कलाकारांचे वृद्धापकाळात होणारे हाल थांबतील आणि त्यांची निवासाची शाश्वत सोय होणार आहे, असे मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.