Desh

ज्यांनी मला मतदान केले नाही, त्यांना रडवणार; भाजप महिला मंत्र्यांचे वादग्रस्त विधान   

By PCB Author

December 13, 2018

भोपाळ, दि. १३ (पीसीबी) –  मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव झाल्यानंतर शिवराज चौहान यांच्या सरकारमध्ये  मंत्री राहिलेल्या अर्चना चिटणीस यांचाही पराभव झाला आहे. त्यानंतर त्यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी घेतलेल्या एक सभेत ज्यांनी मला मतदान केलेले नाही, त्या मतदारांना आता रडवणार आहे, असे वादग्रस्त विधान केले आहे.  

यावेळी अर्चना  म्हणाल्या की,  सत्तेत असताना जशी माझी भूमिका होती. तशीच माझी भूमिका सत्तेबाहेर राहून मी निभावणार आहे. ही भूमिका अधिक चांगली निभावणार आहे. ज्या लोकांनी मला मतदान केले त्यांची मान खाली जाणार नाही. मात्र, ज्या लोकांनी चुकून किंवा बाहेरच्या लोकांचे ऐकून तसेच भीतीने मला मतदान केले नाही, त्यांना मी चांगलेच रडवणार आहे. अन्यथा माझे नाव अर्चना चिटनीस नाही आणि त्यांना आता चांगलाच पश्चात्ताप होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

बुरहानपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अर्चना चिटणीस या ठाकूर सुरेंद्र सिंग यांच्याकडून ५ हजार १२० मतांनी पराभूत झाल्या आहेत. या मतदारसंघात एकूण ५ हजार ७२४ नोटाची मते पडली आहेत. ही परिस्थिती नेपानगर विधानसभा मतदारसंघातही दिसून आली. येथे भाजप उमेदवाराचा पराभव काँग्रेस उमेदवार सुमित्रा कास्डेकर यांनी १२६५ मतांना केला. येथे नोटाची मते २५५२ अशी पडली आहेत.