ज्यांना बालवाडीही सुरू करता आली नाही, त्यांनी आरोप करणे हास्यास्पद – दिलीप वळसे पाटील

0
411

मंचर (जि. पुणे), दि. ४ (पीसीबी) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राज्य व देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ते काम करतात. ते जातीपातीचे राजकारण करतात, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप बालिशपणाचा आहे. भोंगा व पवारसाहेब याव्यतिरिक्त ठाकरे यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. हे जनतेच्याही लक्षात येत आहे. ज्यांना बालवाडीही सुरू करता आली नाही, त्यांनी आरोप करण्याऐवजी महागाई, इंधन दरवाढ याबाबत बोलले असते तर चांगले झाले असते. पण, हे सर्वकाही ठरवून चाललेले आहे. पवारसाहेबांचे काम नजरेआड करण्यासाठीच राज ठाकरेंचा हा खटाटोप सुरू आहे. त्यात त्यांना यश येणार नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सोमवारी (ता. २ मे ) गृहमंत्री वळसे पाटील पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद येथे झालेल्या सभेत ठाकरे यांनी पवार यांच्यावर केलेल्या टीकेविषयी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांविषयी वळसे पाटील म्हणाले की, गेली ५० ते ६० वर्ष पवार यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे केलेले काम व विकास कामे जनतेने जवळून पाहिली आहेत. मुंबई व औरंगाबादच्या सभेत फक्त पवारांवर टीका आणि भोंगा या व्यतिरिक्त कोणत्याही मुद्याला त्यांनी स्पर्श केला नाही. महागाईमुळे जनता त्रस्त आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. पेट्रोल, डिझेलचे बाजारभाव गगनाला भिडले आहेत. याबद्दल राज ठाकरे चक्कर शब्दही बोलत नाही. भविष्यकालीन उपाययोजनांबाबत बोलण्याऐवजी नसलेल्या गोष्टी उकरून काढून समाजात वादंग निर्माण होईल. असे वक्तव्य त्यांनी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व घटकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे. ठाकरे यांच्याकडे सांगण्यासाठी कुठलाही कार्यक्रम नाही. भोंगा व नास्तिक असे मुद्दे काढून ते बोलतात. खोटे व बालिशपणाचे आरोप करतात. पवारांवर बोलले की प्रसिद्धी मिळते. राज ठाकरे यांचा बोलवता धनी भाजप आहे. हे आता सर्वश्रुत झाले आहे. इतिहासात रमणे ठीक आहे. पण भविष्यातील प्रश्न, उपाययोजना याबाबतही विचार मांडणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात तसं घडत नाही, असा टोलही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.