ज्ञानेश्वर मुळे ६ नोव्हेंबररोजी करणार मोठी राजकीय घोषणा

0
616

पुणे, दि. ५ (पीसीबी) – भारताचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे ५ नोव्हेंबररोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर ते सक्रीय राजकारणात येण्याची चर्चा सुरू आहे. पुण्यात काही दिवसापूर्वी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी मुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची    जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान मुळे यांनी याबाबत निवृत्त झाल्यानंतर स्पष्टपणे बोलू, असे म्हटले होते. त्यामुळे ६ नोव्हेंबररोजी ते निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.    

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. मुळे यांचे मूळगाव अब्दुललाट  हे हातकणंगले मतदारसंघात येत आहे. गेल्यावेळी शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसकडून मुळे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, ती चर्चा हवेतच विरली होती. दरम्यानच्या काळात मुळे यांचे भाजप नेत्यांशी जवळीक वाढली आहे. राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी भाजपकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे  मुळे यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा भाजपकडून शेट्टीविरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, मुळे यांनी सेवानिवृत्त झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बोलेन’, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते  लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलतील,  अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अलीकडच्या काही दिवसांत मुळे यांच्या भाषणातून राजकारणाचे संकेत मिळत आहेत.  हातकणंगले  मतदारसंघात शेट्टी यांना रोखण्यासाठी भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे मुळे यांच्या नावाला तरूणाईमध्ये असलेले वलय पाहता भाजपकडून त्यांच्या नावाला पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे.