ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेचे उदघाटन

0
328

चिखली, दि.११ (पीसीबी) – चिखली येथील महाराष्ट्र विकास केंद्राच्या कॉनक्वेस्ट महाविद्यालयांमध्ये ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. व्याख्यान मालेचे हे सहावे वर्ष आहे. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन झाले.

व्याख्यानमालेचे उदघाटन पिंपरी चिंचवड व्याख्यानमाला समितीचे कार्यवाह आणि प्रसिद्ध निवेदक,कवी, व्याख्याते राजेंद्र घावटे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी NDA प्लास्टिक कंपनीचे संस्थापक व उद्योजक दामाजी आसबे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलयज्ञ अनिल पाटील होते, महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवव्याख्याते प्रदीप कदम उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प चैताली माजगावकर-भंडारी यांनी ‘भरारी यशाची’ या विषयावर गुंफले. ” विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे, आपल्या आजूबाजूला असलेल्या आदर्शांचा विचार करायला शिकले पाहिजे. महामानवांच्या चरित्रातून आपण वेगळ्या गोष्टी शिकुन त्याचा संदर्भ आपल्या आयुष्यामध्ये वेळोवेळी घेतला पाहिजे, तसेंच आजूबाजूला सर्वसामान्य माणसेही यशस्वी होत असतात. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा”, असे प्रतिपादन केले.
उदघाटक राजेंद्र घावटे यांनी आपल्या मनोगतामध्ये ” ज्ञानसत्रातून वैचारिक प्रबोधन ही काळाची गरज आहे.मरगळलेल्या समाज मनांना जागृत करण्याचे सामर्थ्य प्रबोधनात आहे. संतांनी या भूमीत प्रबोधन परिणामकारक पद्धतीने केले आहे.” असे सांगत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचे महत्व सांगितले.

व्याख्यानमाले तून आदर्श नागरिक घडतील यात शंकाच नाही अशा विश्वासही व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी विनाअनुदानित कॉलेजमध्ये शिकताना खूप काही शिकता येते हा अनुभव जलतज्ञ व महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी व्यक्त केला आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांचा विचार करून अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये उपयुक्त ठरतात असेही मत व्यक्त केले.

प्रास्ताविकामध्ये प्राचार्य प्रदीप कदम यांनी “आपल्या विद्यार्थ्यांनी वैचारिकता आणि मानसिकता टिकवणे महत्त्वाचे आहे संघर्षाला सामोरे ज्याला जाता येते तोच विद्यार्थी यशस्वी होतो” असे सांगितले. सदर व्याख्यानमाला फेसबुक व यु ट्यूब च्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहे. प्रा. अमोल कवडे आणि सिद्धार्थ डोंगरे यांनी निवेदन केले तर मंगेश किनगे यांनी आभार मानले. या व्याख्यानमालेसाठी प्रा. वैभव पताळे, प्रा. अण्णासाहेब लावंड, प्रा. गणेशराज कसबे आदी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.