Videsh

‘जैश-ए-मोहम्मद’ चा म्होरक्या मसूद अजहर अखेर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

By PCB Author

May 02, 2019

जीनिव्हा, दि. २ (पीसीबी) – ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला अखेर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत आज या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अजहरचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, यासाठी भारताने जोरदार प्रयत्न सुरू केले होते. या कामी संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा परिषदेच्या सर्व देशांचे मन वळविण्यात भारताला यश आले होते. मात्र, चीन सातत्याने यात खोडा घालत होता. मसूदला दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव गेल्या दहा वर्षांत चारवेळा संयुक्त राष्ट्रसंघापुढे ठेवण्यात आला होता. मात्र, भारतावर राजकीय कुरघोडी करण्यासाठी व पाकिस्तानला चुचकारण्यासाठी चीनने चारही वेळा नकाराधिकार वापरून हा प्रस्ताव हाणून पाडला. चीनच्या या भूमिकेनंतरही भारताने प्रयत्न सुरूच ठेवले होते. अनेक मार्गांनी चीनवर दबाव वाढवण्यात येत होता. अमेरिका, फ्रान्स व ब्रिटननेही चीनवर दबाव वाढवला होता. श्रीलंकेतील भयंकर आत्मघाती स्फोटांनंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आणि चीनला नमते घेणे भाग पडले.