“जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार?”

0
385

मुंबई,दि.३०(पीसीबी) : भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार यांच्या एका वक्तव्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. तेव्हा त्यांनी केंद्राच्या मदतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि त्यासाठीच्या आंदोलनाचं नेतृत्वही करावं, असं आवाहन केलं होत.

पवारांच्या या वक्तव्यावर निलेश राणे यांनी टीका करत ट्विट केलं आहे कि,“शरद पवार यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे आश्चर्य वाटतं. पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार? या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं शरद पवार यांच्याकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही,”असं निलेश राणे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणास नुकतीच स्थगिती दिली आहे. या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. या लढ्यात तयार झालेले गट-तट आणि नेतृत्वाच्या मुद्दय़ावरूनही विविध मतमतांतरं होत असल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस असलेल्या संभाजीराजे आणि उदयनराजे यांनीच पुढाकार घेण्याची मागणी पुढे येत आहे. हाच धागा पकडत पवार म्हणाले की,”या दोघांनीच या लढ्याचं नेतृत्व करावं. हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. तेव्हा त्यांनी भाजपाकडून या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.”