“जे सोडून गेले त्यांच्याबाबत चर्चा करून वेळ वाया घालवणाऱ्यांपैकी मी नाही”

0
262

ठाणे, दि.२४ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महत्वाचा सल्ला दिलाय. पक्षाने मोठे केलेले लोक आज सत्तेसाठी पक्ष सोडून गेले, जे सोडून गेले त्यांच्याबाबत चर्चा करून वेळ वाया घालवणाऱ्यांपैकी मी नाही, असे सांगतानाच उलटपक्षी पुन्हा नव्याने बुरुज उभा करण्याकडे आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवं, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वात जयंत पाटील आज मिरा-भाईंदर आणि ठाणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि अन्य नेते उपस्थित होते.

कुणीही पक्ष सोडून गेला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून यायला हवा, अशी संघटनात्मक रचना आपण केली पाहिजे. बुथ कमिट्यांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायला हवे. बुथ कमिट्या जर मजबूत असेल तर कोणीही आपला पराभव करू शकणार नाही, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केलाय. 2019 ला ज्यांच्या बुथ कमिट्या मजबूत होत्या त्यांना विजय मिळाला. थोड्याबहुत मतांच्या फरकाने जे पराभूत झाले त्यांचा पुढच्या वेळी विजय निश्चितच होणार, असंही पाटील यावेळी म्हणाले.

60-70 वर्षात देशाने जे कमावले त्याला विकण्याचा रितसर कार्यक्रम केंद्र सरकारतर्फे केला जात आहे. जनतेचे शोषण सुरू आहे. याचे प्रबोधन लोकांमध्ये करायला हवं आणि हे करण्यासाठी आपल्याला सैन्य लागेल. ते सैन्य आपण उभे करूया आणि केंद्र सरकारचे अपयश घराघरात पोहोचवूया, असं आवाहनही पाटील यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे. ठाण्यातील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वकाही दिले पण याच लोकांनी ऐनवेळी धूम ठोकली. किसन कथोरे असतील, कपिल पाटील असतील यांना महत्त्वाची पदे दिली तरी पक्ष सोडून गेले. अशा लोकांना धडा शिकवणे गरजेचे आहे. त्यासाठी ही परिस्थिती बदलायची आहे, असंही पाटील म्हणाले.

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आज तरुण कार्यकर्ते आपल्या सोबत उभे आहेत. याच तरुणाईच्या जोरावर आपण इथला निकाल पुढच्या काळात बदलून टाकू. ही कुस्ती आपणच जिंकू आणि विरोधकांना पार चितपट करू, असा दावा आव्हाड यांनी केलाय.