जे काही करायचे आहे, ते वर्षभर करा, नाहीतर ‘चुन चुनके…’; धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा

0
1527

पुणे, दि. २६ (पीसीबी) – केंद्रातील आणि  राज्यातील भाजप  सरकारने  गेल्या चार वर्षात   विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आहे. सरकारने आता जे काही करायचे आहे, ते वर्षभर करा, त्यानंतर  खपवून घेतले जाणार नाही,  ‘चुन चुनके…’ आणि ‘चुकीला माफी नाही’ अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपला  इशारा दिला.

पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल हडपसर ग्रामस्थ सत्कार समितीच्यावतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते तुपे यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी  मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले की, आघाडी सरकारने महागाई केल्याचे सांगून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेची दिशाभूल भाजपने केली. मात्र, त्यांच्या काळात  ५० रुपये पेट्रोल ८० रूपये झाले. तर  ४०० रुपयांचा गॅस ८०० रूपये झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत खासदार, आमदार आणि नगरसेवक निवडून आले. मात्र, लाट कधी कायम राहत नाही, हा देशाचा इतिहास आहे. पुढील निवडणुकीत भाजपचा पराभव होईल,  असा दावा त्यांनी यावेळी केला.

ज्या नागरिकांनी मतदान करून भाजपला सत्तेमध्ये बसविले. तेच यांना आता खाली खेचतील, असेही मुंडे यावेळी म्हणाले. यावेळी राज्याचे मंत्री,  केंद्रीय मंत्री पुण्याचे आहेत. मात्र, पुणे शहराचा विकास कुठे गेला, अशा शब्दांत मुंडे यांनी गिरीश बापट, दिलीप कांबळे, प्रकाश जावडेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले.