जेष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे निधन

0
345

पुणे, दि. २५ (पीसीबी) – फँड्री, ख्वाडा, सैराट, म्होरक्या यांसह जवळपास १०० चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं निधन झालं. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होती. चित्रपटांसोबत त्यांनी वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या होत्या. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.

मराठी, हिंदी चित्रपट, वेब सीरिज व लघुपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये त्यांनी गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दिकी) वडिलांची भूमिका साकारली होती. रामचंद्र धुमाळ यांना वयाच्या उत्तरार्धात चित्रपटांतील भूमिका मिळाल्या. पण त्या भूमिकांतून त्यांनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
‘एखाद्या तरुणाला लाजवेल इतक्या ताकदीने आणि वास्तववादी अभिनय करणारा बाप माणूस गमावला’, अशा शब्दांत चाहत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ‘चित्रपटात भूमिका किती लांबीची आहे, किती मानधन मिळणार आहे, या सगळ्यांचा कधीच धुमाळ काकांनी विचार केला नाही. २००७ मध्ये उरूस चित्रपटात अगदी छोटासा रोल होता. धुमाळ काका पुण्यातून अलिबागला आले. कसलीही तक्रार नाही. तेव्हापासून त्यांचा आणि माझा परिचय… जय शंकर, म्हैस मधील भूमिका सुद्धा खूप मोठी नव्हती. पण कामाच्या बाबतीत काका नेहमीच चोख,’ अशा शब्दांत चित्रपट वितरक शेखर नाईक यांनी भावना व्यक्त केल्या.