जेव्हा एकटा असायचो, तेव्हा डोळ्यातून पाणी यायचे – शरद पवार

0
632

उस्मानाबाद, दि. ३० (पीसीबी) –  लातूर-उस्मानाबादला भूकंप झाल्यानंतर बाधितांना मदतीसोबतच धीर दिला. त्यांच्यात आत्मविश्वास जागविला. मात्र, जेव्हा एकटे असत.  तेव्हा मन सुन्न करणारी स्थिती डोळ्यासमोर तरळायची. आणि पाणी डोळ्यातून यायचे, अशा आठवणी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बलसुर (जि. उस्मानाबाद) येथे सांगितल्या.

लातूर भूकंपाला २५  वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बलसुर ग्रामस्थांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा आज (रविवारी) आयोजित केला होता. यावेळी पवारांनी त्यावेळच्या परिस्थितीला, आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले, किल्लारीला भूकंप झाल्याचे समजताच विमानाने सकाळी ६ वाजता लातूरला पोहोचलो. तेथून भूकंपग्रस्त भागात गेलो. सर्वत्र हाहाकार उडाला होता. प्रेताचे खच दिसत होते. सुन्न करणारे चित्र नजरेसमोर होते. अशावेळी वाचलेल्या लोकांना धीर देण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी शेजारच्या जिल्ह्यातून वैद्यकीय सेवा मागविली. पुढे चांगल्या पद्धतीने गावांचे पुनर्वसन करण्यात आले. आज येथील माणसे सन्मानाने उभी राहिली, याचा आनंद वाटतो, अशी भावना  पवार यांनी व्यक्त केली.