जेवणाच्या निविदेसाठी पुन्हा आजी-माजी नगरसेवकांच्या संस्था-संघटना

610

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महपालिका प्रशासन विविध मार्गांनी प्रयत्न करते आहे. आपत्कालीन खरेदी थेट पध्दतीने असल्याने त्यात अनेकांना हात धुवून घेतले. मास्क व पीपीई किट खरेदी, जेवण पुरविण्याचे कंत्राट आदी मध्ये मोठा झोल झाल्याच्या असंख्य तक्रारी झाल्या. लाखो रुपयेंचा भ्रष्टाचार झाल्याचा सत्ताधारी भाजपवरा गंभीर आरोप झाले. सर्वपक्षांच्या आजी-माजी नगरसेवकांनी त्यात पैसे लाटल्याची काही प्रकरणे चर्चेत आहेत. कायद्यानुसार महापालिकेच्या कुठल्याही कंत्राटामध्ये नगरसेवक अथवा त्यांच्या नातेवाईकांनी सहभागी होता येत नाही. इतके सर्व माहित असूनही ही लूट सुरूच आहे. कोरोना बाधित अथवा क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना जेवण पुरविण्यासाठी यापुर्वी थेट पध्दतीने ४०० रुपये प्रमाणे काम दिले होते. बोभाटा झाल्यावर ते २५० रुपये प्रमाणे बिल काढायला सुरवात झाली. आता पुन्हा या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या तर १८० रुपये प्रमाणे जेवण पुरविण्याचे काम करायला संस्था संघटना तयार आहेत, असे समोर आले.

जेवण पुरविण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. २९ संस्था संघटनांनी निविदा भरल्या. त्यातही आजी-माजी नगरसेवकांनी आपल्या संस्था, प्रतिष्ठानच्या वतीने निविदा दाखल केल्या आहेत. शहरातील महिला बचतगट काही हॉटेल चालक, खानावळीचे मालक यांनी निविदेत सहभाग घेतला. सांगवी भागातील एका नगरसेविकेने मुदतीनंतर निविदा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, अधिकाऱ्यांनी प्रतिबंध करताच त्यांनी दमदाटी केली असल्याचे समजले. निविदा उघडताच सर्वात कमी दराची म्हणजे १८० रुपये प्रमाणे जेवण पुरविण्याचे काम करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यानुसार सर्वांनी कमी दर करून १४ लोकांना विविध सेंटरसाठी हे काम वाटून देण्यात आले आहे.

दरम्यान, जेवण पुरविण्याच्या या कामात पूर्वीचे दर (४०० नंतर २५० रुपये) आणि आताचे (१८० रुपये) यातील तफावत मोठी असल्याने आजवर झालेल्या कामात किती मोठा झोल झाला असेल याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता पुढे आली आहे.