जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची प्रशांत किशोर यांच्याकडे जबाबदारी      

0
458

पाटणा, दि. १६ (पीसीबी) – काही दिवसापूर्वी जेडीयूमध्ये प्रवेश केलेल्या निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे प्रशांत किशोर हे आता जेडीयूत क्रमांक दोनचे नेते ठरले आहेत.

१६ सप्टेंबरला  प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड या पक्षात प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू बिहारमधून एकत्र निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे यावेळीही प्रशांत किशोर यांचा करिष्मा चालला, तर नितीश कुमार यांचा राजकारणातील दबदबा पुन्हा वाढणार आहे. त्याचबरोबर प्रशांत किशोर यांच्यावरही आगामी काळात आणखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या  दिल्या जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जेडीयूमध्ये प्रवेश करताना प्रशांत किशोर म्हणाले होते की, जेडीयूचा प्रस्ताव मला गेल्या अनेक दिवसांपासून होता, मात्र आता ही योग्य वेळ आहे. सरकारमध्ये असो वा पक्षात, नितीश कुमार जी जबाबदारी सोपवतील ती मी योग्यरित्या पार पाडेल. आता त्यांच्याकडे जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी  देण्यात आलेली आहे.