Pune Gramin

जुन्नरच्या शिवसेना नेत्या आशा बुचकेंची पक्षातून हकालपट्टी   

By PCB Author

June 27, 2019

पुणे, दि. २७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम केल्याप्रकरणी  शिवसेनेच्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि जुन्नरमधील नेत्या आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी  करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनाही पदावरुन  हटवले आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी  पराभव केला होता. परंतु हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील दोन प्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांनाही दोन दिवसांपूर्वी पदावरुन  हटविण्यात आले आहे.