जुनैद खान हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीलाही जामीन मंजुर

0
465

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – जुनैद खान हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अंतरिम जामीन मंजुर करण्यात आला आहे. आज (बुधवारी) पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला. मुख्य आरोपीला जामीन मिळाल्यामुळे आता जुनैद खान मॉब लिंचिंग प्रकरणातील सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत, कारण या प्रकरणातील अन्य पाच आरोपींना यापूर्वीच जामीन मंजुर झाला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी नरेश कुमार हा जुलै २०१७ पासून न्यायालयीन कोठडीत होता. वर्षभरापासून तुरूंगात असल्यामुळे त्याला जामीन मिळावाल असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलाने केला होता. यापूर्वी ७ जून रोजी फरिदाबादच्या सत्र न्यायालयाने आरोपीची जामिनाची याचिका फेटाळली होती. नरेश कुमारवर अत्यंत गंभीर स्वरुपाचा आरोप आहे, जर त्याला जामीन मिळाला तर तो साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे असं म्हणत त्यावेळी कोर्टाने जामीन नाकारला होता. मात्र, आज न्या. दया चौधरी यांनी आरोपीला जामीन मंजुर केला.

२२ जून रोजी जुनैद, त्याचे भाऊ हासीम व शकीर तसेच चुलत भाऊ मोईन हे दिल्लीत ईदच्या खरेदीसाठी गेले होते. तिथून पलवलमधील खांदवली या आपल्या गावी परतत असताना जुनेदला ट्रेनमध्ये हिंसक जमावाकडून झालेल्या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता. रेल्वे प्रवासादरम्यान जुनैद आणि त्याचा भावांचे चार-पाच तरुणांशी सीटवरुन भांडण झाले. यानंतर या तरुणांनी ‘गोमांस खाणारे’ म्हणत जुनैद आणि त्याच्या भावंडांच्या डोक्यावरील टोपी उडवून लावली आणि दाढी खेचण्याचा प्रयत्न केला. भांडणानंतर जुनैद रेल्वे स्थानकावर उतरला. यावेळी त्याला मारहाण करण्यात आली. एकाने जुनैदला चाकूने भोसकले. यानंतर जखमी जुनैदचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू झाला होता. जुनैदच्या हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. हरियाणामधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.