जीवनात सुख-शांतीसाठी मधुर वाणी आवश्यक – प्रतिभाकुंवरजी महाराज  

0
437

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – आत्मकल्याणासाठी वेळप्रसंगी शारीरिक पीडा सहन करण्याची तयारी असली पाहिजे. अन्न-पाणी जीवनास जेवढे आवश्यक आहे तेवढेच इतरांच्या जीवनात सुख-शांती येण्यासाठी मधुर वाणीदेखील आवश्यक आहे. वाणीतील मधुरताच माणसाला श्रेष्ठ बनवीत असते. समोरची व्यक्ती जर आपल्या वाणीतून राग, व्देष, मत्सर व्यक्त करीत असेल, तरी आपण त्यावर आपल्या मधूर वाणीतून थंड पाण्याप्रमाणे शिडकावा करावा. वाणीमधील दुष्ट आणि कठोर शब्द पिढ्यानपिढ्या वैरभाव, व्देष निर्माण करतात. त्यामुळे सर्वांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे, असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी निगडी येथे केले.

निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे पवित्र चार्तुमास महिन्यानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब आणि प.पू.प्रफुल्लाकंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले आहे. यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, सुनिल नहार, रमणलाल लुंकड, पारस मोदी, सुभाष ललवाणी, मनोज सोळंखी, बाळासाहेब धोका, मोहनलाल संचेती आदींसह बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी सांगितले की, अपमान करणे मानवी स्वभावात असते; परंतु सन्मान करणे संस्कारात असते. तन, मन, वाणीवर विजय मिळवून शुद्ध विवेक बुद्धीने शुभ कार्याकडे सकारात्मकतेने वाटचाल केली की, आत्मकल्याणाचा मार्ग सापडतो. सासू-सास-यांनी आपल्या सुनेच्या छोट्या चुकांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करावे. त्यांना सौम्य शब्दात समजून सांगावे. चिडून क्रोप करुन उपयोग होत नाही. सुनेनी वेळ प्रसंगी शांत राहून आपल्या सासूच्या तिखट शब्दांवर मधूर वाणीने थंड पाण्याप्रमाणे शिडकावा करावा. असे झाले तर सर्व कुटूंबात शांती, समृध्दी नांदेल. प्रत्येकाला जीवनात सर्व गोष्टी मिळत नसतात, नाहीतर माणूस संतांना, देवाला देखील जुमाणार नाही. असेही प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या.