‘जीवनशैलीचे आजार रोखण्यासाठी आहार, विहार, आचार, विचारात बदल करा’: डॉ. पद्मश्री चंद्रकांत पांडव

0
351

– आयोडीन मॅन ऑफ इंडिया डॉ. चंद्रकांत पांडव यांची ‘ग्लोबल वेलबिईंग प्रोग्राम्स’ केंद्रास सदिच्छा भेट

पुणे, दि. 29 (पीसीबी) – कोरोना कोविड -19 हा साथीचा आजार आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेमध्ये निदर्शनास आलेल्या नियोजन आणि व्यवस्थापनातील त्रुटी दूर करुन आता तीसरी लाट रोखण्यासाठी युध्दस्तरावर नियोजन केले पाहिजे असे प्रतिपादन आयोडीन मॅन ऑफ इंडिया पद्मश्री डॉ. चंद्रकांत एस. पांडव यांनी केले.

जुनी सांगवी येथील संशोधक अनिल घनवट यांच्या ‘ग्लोबल वेलबिईंग प्रोग्राम्स’ (विश्व कल्याण उपक्रम) केंद्रास सदिच्छा भेट देण्यासाठी डॉ. पांडव गुरुवारी (दि. 29 जूलै) आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते डॉ. पांडव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक अतुल शितोळे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, डॉ. विश्वनाथ भुक्तर, बाळकृष्ण उ-हे, डॉ. राजेंद्र मोरे, ॲड. अशोक फडके, गणेश तनपुरे, पुजा फडके, माधुरी घनवट, उज्ज्वला जाधव, जवाहर पगारीया आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. पांडव म्हणाले की, एखाद्या आजारावर उपचार, संशोधन होण्यापेक्षा आजारमुक्त समाज घडविणे हे ध्येय ठेऊन काम केले पाहिजे. साथीच्या आजारांवर वैद्यकीय तज्ञ, प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचारी वर्ग, प्रशासन आणि समाज यांनी एकत्रित येऊन नियंत्रण मिळवता येते. डायबेटीस पासून कॅन्सर पर्यंत उद्‌भवणारे आजार हे जीवनशैलीचे आजार आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या आहार, विहार, आचार, विचारात बदल करावा लागेल. प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचारसरणी आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार मिळाल्यास जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार रोखता येतील. अशा जीवघेण्या आजारांवर नियंत्रण मिळवता आले तर मानवाचे निरोगी आयुर्मान वाढेल. या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी चिकाटी आणि संयम असला पाहिजे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ गॅलीलीओ यांनी पृथ्वी ही सूर्या भोवती फिरते असे संशोधनाअंती सांगितले, परंतू तत्कालीन प्रशासनाने त्यांना वेडा ठरविले. वयाच्या सोळाव्या वर्षी पसायदानातून ‘आता विश्वात्मे के देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे’ हा संपुर्ण विश्व माझे घर आहे अशी संकल्पना मांडून शांतीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर महाराज देखिल संशोधकच होते. त्यांनी दिलेल्या विश्वशांतीच्या संदेशातूनच जगात शांतता नांदेल आणि अखिल मानव उत्क्रांतीकडे वाटचाल करेल. ज्ञानेश्वर माऊली, जगद्‌गुरु तुकाराम महाराजांचा वारसा महाराष्ट्र भूमीला लाभला आहे. येथे विज्ञान, तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी विकास करणे शक्य आहे असाही आशावाद डॉ. पांडव यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक करताना विश्व कल्याण उपक्रमाचे संस्थापक अनिल घनवट म्हणाले की, मागील तीस वर्षांपासून नैसर्गिक आरोग्य या क्षेत्रामध्ये संशोधन आणि उपक्रम राबवित आहे. यामध्ये ध्यान प्रकार, भारतीय वैदिय ध्यान पध्दती, गुरु – गुरुकुल, धार्मिक – अध्यात्मिक ध्यान पध्दती याचा अभ्यास करुन मानवाच्या सुखी संपन्न सुद्दड जीवन शैलीसाठी शास्त्रीय ध्यान पध्दती विकसित केली आहे, असे अनिल घनवट यांनी सांगितले.