जीपीएसद्वारे उघडकीस आली डंपरचोरी; डंपर चोरीचे सहा गुन्हे उघड

0
216

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – डंपरचोरी करून त्याची भंगारच्या गोडाऊनमध्ये विल्हेवाट लावणाऱ्या एका टोळीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डंपरला लावलेल्या जीपीएस द्वारे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी ही कारवाई केली. भंगार गोडाऊन मालक आणि डंपर चोरणा-या दोघांकडून 18 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अक्रम आयुब शेख (वय 43, रा. जाधववाडी, चिखली), महेश मारुती फंड (वय 23, रा. आळंदी देवाची, ता. खेड), सिद्धप्पा बसप्पा दोडमणी उर्फ धोत्रे (वय 27, रा. कुसाळकर चौक, जनवाडी, पुणे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह राजेश नागापुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन परिसरातून 23 मार्च रोजी एकडंपर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून देखील डंपर चोरी झाल्याची तक्रार दाखल होती. त्या डंपरच्या मालकाशी संपर्क केल्यानंतर माहिती मिळाली की, डंपरला जीपीएस आहे. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून चोरी केलेला डंपर हा चिखली कुदळवाडी या परिसरातील भंगार दुकानामध्ये गेला असल्याचे निष्पन्न केले. अक्रम अयुब शेख याचे ए एस एंटरप्रायजेस हे भंगार गोडाऊन 20 ते 30 गुंठे परिसरात आहे. गोडाऊनची झडती घेतली असता त्यात एम एच 42 / बी 8223 हा डंपर ग्राइंडरच्या साहाय्याने कटिंग केला जात असल्याचे निदर्शनास आले. हा डंपर महेश फड, सिध्दप्पा दोडमणी, राजेश नागापुरे यांनी आणून दिल्याचे अक्रम खान याने सांगितले. पोलिसांनी अक्रम खान, महेश आणि सिद्धप्पा यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन डंपर, इंजिन, इंजिनचे पार्ट, एक मोटारसायकल, एक इको गाडी असा 18 लाख 70 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील डंपरचोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.