Desh

जिना पहिले पंतप्रधान झाले असते, तर देशाचे तुकडे झाले नसते; भाजप उमेदवाराचे धक्कादायक विधान

By PCB Author

May 12, 2019

भोपाळ, दि. १२ (पीसीबी) – जर मोहम्मद अली जिना  देशाचे पहिले पंतप्रधान  झाले असते,  तर देशाचे तुकडे झाले नसते, असे धक्कादायक विधान भाजपचे लोकसभेचे उमेदवार गुमानसिंह डामोर यांनी केले आहे. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या  रणधुमाळीत एकमेकांवर आरोप-प्रत्योरापांची राळ उडवली जात आहे. या दरम्यान  गुमानसिंह डामोर यांनी  प्रचारसभेत धक्कादायक विधान केले आहे. काँग्रेस पक्षाची स्थापना केवळ इंग्रजाना मदत करण्यासाठी झाली होती. देशाचे तुकडे होण्यास केवळ काँग्रेस जबाबदार आहे, असेही  गुमानसिंह डामोर यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाची विभाजनकरी निती अद्यापही  सुरु आहे. काश्मीरची समस्या काँग्रेस पक्षाचीच देन आहे,  असा आरोपही त्यांनी केला.  मोहम्मद अली जिना एक उत्तम वकील आणि विद्वान व्यक्ती होते. जर त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हट्ट धरला नसता आणि देशाचे पहिले पंतप्रधान जर मोहम्मद अली जिना झाले असते तर देशाचे तुकडे झाले नसते,  असेही त्यांनी म्हटले आहे.