जिना पंतप्रधान झाले असते, तर भारताची फाळणी झाली नसती – दलाई लामा

0
637

पणजी, दि. ८ (पीसीबी) – पाकिस्तानचे संस्थापक मोहंमद अली जिना यांनी भारताचे पहिले पंतप्रधान व्हावे, अशी महात्मा गांधी यांची इच्छा होती. परंतु त्यास पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध दर्शवला होता. जिना देशाचे पंतप्रधान झाले असते, तर भारताची फाळणी झाली नसती, असे तिबेटीयन आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी म्हटले आहे.

गोव्यातील संखलिम शहरातील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे एका कार्यक्रमात लामा बोलत होते. यावेळी लामा यांना विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्त्र देताना ते बोलत होते.

जिना देशाचे पंतप्रधान झाले असते तर भारताची फाळणी झालीच नसती. त्यासाठी पंडित नेहरू यांनी आपला आग्रह मागे घ्यायला हवा होता. त्यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव साफ फेटाळून लावला होता, असे लामा यांनी सांगितले.

जवाहरलाल नेहरू हे आत्मकेंद्री होते. त्यांना स्वत:ला देशाचे पंतप्रधान होण्याची इच्छा होती. महात्मा गांधी यांच्या मतानुसार जिना पंतप्रधान झाले असते, तर भारत-पाकिस्तान एकसंघ राहिले असते. नेहरू खूप विद्वान, अनुभवी व्यक्ती होते, याची मला पूर्ण कल्पना आहे. मात्र, विद्वान माणसेही चुका करत असतात. त्यापैकीच ही एक ऐतिहासिक चूक म्हणावी लागेल, असे लामा यांनी सांगितले.