Maharashtra

जावेद अख्तर आणि शबाना आझमी देशद्रोही – कंगना रणौत

By PCB Author

February 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण असून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी केली जात आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूडमध्येही संतापाची लाट असून सेलिब्रेटी आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगना रणौतनेही संताप व्यक्त करत पाकिस्तानचे निमंत्रण स्विकारल्याबद्दल जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावर टीका केली आहे. जावेद अख्तर आणि शबाना आझमी देशद्रोही असल्याचे कंगनाने म्हटले आहे.

जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या पाकिस्तान जाण्याबद्दल कंगनाला विचारण्यात आले होते. त्यावर त्या ते देशद्रोही आहेत अशी टीका कंगनाने केली. ती म्हणाली, जावेद अख्तर आणि शबाना आझमी पाकिस्तानशी संस्कृतीचे अदान-प्रदान करतात. हे तेच लोक आहेत जे ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांचे समर्थन करतात. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. तरी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना पाकिस्तानमध्ये कार्यक्रम घेण्याची गरज का वाटली? असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.

कराची आर्ट काॅन्सिलकडून जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना कराची साहित्य महोत्सवाचे आमंत्रण आले होते. दोघांनीही हे आमंत्रण स्वीकारले होते. यासाठी दोन दिवसांचा कराची दौरा दोघेही करणार होते. मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत या दोघांनीही पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. हा कार्यक्रम २३ आणि २४ फेब्रुवारीला होणार आहे.