जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी हालचाली   

0
472

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटलेले  शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.  खोतकर यांना पक्षात घेण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत  काँग्रेस पक्षश्रेष्ठी लवकरच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यात विळाभोपळ्याचे  वैर आहे. स्वबळाच्या  घोषणेनंतर  येत्या निवडणुकीत जालन्यात रावसाहेब दानवेंना आस्मान दाखवू, असे अर्जुन खोतकर यांनी  गर्जना केली होती. परंतु शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने त्यांची चांगलीच गोची झाली. ही जागा भाजपला मिळणार असून दानवे येथून लढणार  आहेत.

तरीही दानवेंविरोधात निवडणूक लढवण्यावर खोतकर ठाम आहेत. युती झाली तरीही मी शंभर टक्के जालन्यातून लढणार आणि विजयीच होणार, असे म्हणत खोतकर यांनी रावसाहेब दानवेंविरोधात  दंड थोपटले आहेत. जालन्यात दानवेंचा  पराभव  करणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.