जालन्याच्या जागेचा पेच कायम; मातोश्रीवरील बैठक निष्फळ  

0
603

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – जालना लोकसभा जागेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना आमदार अर्जून खोतकर यांच्यातील वाद भाजप आणि शिवसेना नेत्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. आज (शनिवार) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांची बैठक झाली. मात्र, या बैठकीत तोडगा निघालेला नाही.

जालन्यातील जागेवर या बैठकीत अंतिम तोडगा निघणार नसल्याचे  आधीच स्पष्ट करण्यात आले होते. मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकाची जबाबदारी पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता खोतकर-दानवे वाद मिटवण्यासाठी पंकजा मुंडे समन्वयकाच्या भूमिकेत असतील, असे  बोलले जात आहे.

मात्र, रविवारी (दि.१७) शिवसेना भाजप युतीचा दुसरा मेळावा औरंगाबादमध्ये  होणार आहे. त्याआधी रामा हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये बैठक  होणार  आहे. या बैठकीत जालनाच्या वादावर  तोडगा काढण्यात युतीच्या नेत्यांना यश येणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.