Maharashtra

जालण्यात तीन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक; राजस्थानमधील विद्यमान आमदाराच्या पतीला अटक

By PCB Author

August 30, 2018

जालना, दि. ३० (पीसीबी) – दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या राजस्थानमधील एका आमदाराच्या पतीला जालना पोलिसांनी अटक केली आहे.  बनवारीलाल कुशवाह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून जालन्यातील तब्बल तीन हजार गुंतवणूकदारांची त्याने फसवणूक केली आहे. धक्कादायक म्हणजे बनवारीलाल स्वत: माजी आमदार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनवारीलाल कुशवाह हे भाजपच्या विद्यमान आमदार शोभाराणी कुशवाह यांचे पती आहेत. शोभाराणी या राजस्थानातील धोलपूरमधून भाजपच्या आमदार आहेत. बनवारीलाल कुशवाह हे गरिमा रिअल इस्टेट अलाईड लिमिटेड या कंपनीचा सूत्रधार आहेत. जालन्यात त्याच्याविरोधात फसवणुकीच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अखेर जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत, थेट राजस्थानातून बनवारीलाल कुशवाह याला अटक केली आहे.