जामिनावर बाहेर आहात, सुटका झालेली नाही, विचार करून बोला; मुख्यमंत्र्यांचे भुजबळांना प्रत्युत्तर  

0
943

नांदेड, दि. २३ (पीसीबी) – तुम्ही  स्वातंत्र्यलढ्यासाठी नव्हे, तर भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगात गेले होते. अजून तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, किती बोलावे आणि काय बोलावे याचा जरा विचार करा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सुचक इशारा दिला आहे.

नांदेड  येथे  भाजपच्या बूथ प्रमुखांच्या  मेळाव्यात मुख्यमंत्री  फडणवीस  बोलत होते. यावेळी त्यांनी    विरोधकांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांच्या सभेला गर्दी होत नाही, म्हणून त्यांना सभेत नकलाकार आणावे लागतात. ती लोक नरेंद्र मोदीजींची स्टाइल मारत फिरतात. पण या नकलाकारांनी  इतकेच लक्षात ठेवावे की तुम्ही सूर्याकडे पाहून थुंकले की थुंकी आपल्याच चेहऱ्यावर पडते,  अशी टीका त्यांनी भुजबळावर केली आहे.

तुम्ही स्वातंत्र्यलढ्यासाठी किंवा गरीबांसाठी तुरुंगात गेला नाही. भ्रष्टाचार केला आणि राज्याच्या तिजोरीतील पैसा स्वत:च्या तिजोरीत भरला म्हणून तुम्ही तुरुंगात गेला. तीन वर्ष तुम्ही तुरुंगात होता आणि अजूनही तुमची सुटका झालेली नाही, हे विसरु नका, असे मुख्यमंत्री  म्हणाले.