Bhosari

जाधववाडीत बिल्डरकडून दाम्पत्याची ७ लाखांची फसवणूक; जाब विचारण्यास गेल्यामुळे पतीला मारहाण करुन महिलेचा विनयभंग

By PCB Author

October 05, 2018

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – जाधववाडी येथील विष्णुविहार या गृहप्रकलामध्ये टु बीएचके फ्लॅट विकत घेण्याची रोख आणि चेकने असे एकूण १६ लाख रुपये दाम्पत्याने बिल्डरला दिले होते. मात्र बिल्डरने रितसर करार नामा न करता दाम्पत्याची फसवणूक करुन फक्त ९ लाख रुपये परत केले आणि ७ लाखांची फसवणूक केली. याबाबत जाब विचारण्यासाठी दाम्पत्य विष्णुविहार या गृहप्रकलाच्या साईट ऑफिसवर गेले असता बिल्डरने महिलेचा ड्रेस फाडून विनयभंग केला तसेच महिलेच्या पतीला जबर मारहाण करुन धमकावून हाकलून दिले.

याबाबत २८ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार विष्णुविहार या गृहप्रकलाचे निर्मलकुमार मगनभाई पटेल, मितेशकुमार पोकर, अंकित प्रवीणभाई पटेल, हिरेन प्रवीणभाई पटेल, भरतभाई शामजीभाई पटेल, सतीशकुमार रावजीभाई पटेल आणि चिरायु चिमणभाई पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दाम्पत्याला जाधववाडी येथील विष्णुविहार या गृहप्रकलामध्ये टु बीएचके फ्लॅट विकत घ्यायचा होता. विष्णुविहार येथील बि विंग दहावा मजला येथील एक टु बीएचके फ्लॅट त्यांनी बुक ही केला होता. त्यासाठी दाम्पत्याने बिल्डर चिरायु पटेल याला फ्लॅटच्या मुळ रकमेतील २० टक्के रक्कम म्हणजेच एकूण १६ लाख रुपये रोख आणि चेकने दिली होती. मात्र बिल्डरने दाम्पत्यासोबत बऱ्याच दिवस करार नामा न करता त्यांच्या बँक खात्यावर ९ लाख रुपये परसपर टाकले आणि तब्बल ७ लाखांची फसवणूक केली. दाम्पत्य या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी जाधववाडी येथील विष्णुविहार या गृहप्रकलपाच्या कार्यालयात गेले असता आरोपी चिरायु पटेल याने महिलेच्या गालावरुन हात फिरवून तिचा ड्रेस फाडला. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तर महिलेच्या पतीला निर्मलकुमार, सतिशकुमार, चिरायू यांनी मारहाण केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सातही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत.