जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी मागितली तब्बल 8 लाख रुपयांची लाच

0
354

पुणे, दि.१७ (पीसीबी) : जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्ताला रंगेहाथ पकडले आहे. नितीन चंद्रकांत ढगे (वय 40) असे या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्ताचा नाव आहे. वानवडी येथील ढगे यांच्या निवासस्थानाजवळ शनिवारी रात्री रात्री पावणे दहा वाजता सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नितीन ढगे हे उपायुक्त तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने 8 लाख रुपयांची लाच मागितली.

तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात ढगे यांनी तडजोड करुन 3 लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या निवासस्थानाजवळ बोलाविले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना पकडण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे , पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, पो.शि.अंकुश आंबेकर, पो.शि. सौरभ महाशब्दे, चालक पो.शि. चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली आहे.